यावल न्युज
फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन जी काकडे यांच्या दालनात स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता निलेश उर्फ पिंटू राणे यांनी केलेली दांडगाई आणि अपमानजनक वर्तन प्रकरणी महसूल कर्मचारी संघटना व ग्राम महसूल अधिकारी संघटना यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राणे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी उद्दाम भाषा वापरून त्यांच्या मान-सन्मानाला ठेच देणारे संवाद करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे कर्मचारी अधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे.
या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत महसूल संघटनांनी जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला असून, संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी योग्य तो समतोल राखत आंदोलनामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन दोन्ही संघटनांना केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही संघटनांनी काळ्या फिती लावून काम करत आपला निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संबंधित निलेश राणे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनांनी स्पष्ट केली आहे.
फैजपूर उपविभागीय अधिकारी बबन जी काकडे हे महसूल विभागातील अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात. नाशिक प्रबोधिनीमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कामकाजामुळेच अनेक वेळा काही स्वार्थी प्रवृत्तींना अडचण निर्माण होते.
याआधीही काही मुद्द्यांवर संबंधितांनी केलेल्या तक्रारींची प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे. तरीदेखील राणे यांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियाचा गैरवापर करत अधिकारी वर्गास त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणी महसूल विभागातील कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन एकात्म निषेध व्यक्त करणे, प्रशासनाच्या पाठीशी उभे राहणे, हे सध्या प्रशासन-सामान्य नागरिक नात्याला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. प्रशासन व संघटनांची संयमी भूमिका आणि कायद्याच्या चौकटीत राहून होणारे आंदोलन हे लोकशाही व्यवस्थेचा सन्मान करणारे असल्याचे प्रतिपादन अनेकांनी केले आहे.