यावल न्युज
यावल तालुक्यातील मोहराळा गावात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. साहिल शब्बीर तडवी (वय १९) या तरुणाचा मृतदेह दिनांक २० जून रोजी गावाजवळील एका विहिरीत आढळून आला. या प्रकरणात यावल पोलिसांनी निलंबित पोलीस कर्मचारी अयुब हसन तडवी व दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
साहिल तडवी हा दिनांक १६ जूनपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात येऊनही तो मिळून आला नव्हता. त्यामुळे यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शुक्रवार, २० जून रोजी मोहराळा गावातून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेवा मधुकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह सापडला.
या घटनेनंतर साहिलच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गावातील निलंबित पोलीस कर्मचारी अयुब तडवी यांच्या घरावर संतप्त हल्ला केला होता. त्यांच्या वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली होती. माहिती मिळताच यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तातडीने पथकासह गावात दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. दुसऱ्या दिवशी, २१ जून रोजी शोकाकुल वातावरणात साहिलचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी निलंबित पोलीस कर्मचारी अयुब तडवी यांच्या सांगण्यावरून साहिलला गांजाचे सेवन करून विहिरीत ढकलल्याची कबुली दिली. त्यांनी साहिलचा मोबाईलही दुसऱ्या विहिरीत टाकल्याचे सांगितले.
यानंतर समीर गफूर तडवी यांच्या फिर्यादीवरून अयुब तडवी व दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत हा खून शेतीच्या वादातून झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व पोलीस हवालदार वासुदेव मराठे करत आहेत.
ही घटना संपूर्ण यावल तालुक्यात खळबळ उडवून देणारी असून पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास अधिक गतीने सुरू आहे.