यावल न्यूज
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश मिळत यावल शहरातील शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजार परिसरात नगरपालिका प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ केला. नागरिक व व्यापारी वर्गाच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हा मुद्दा नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.
यावल शहरातील आठवडे बाजारात नागरिक, महिला, पुरुष तसेच व्यापाऱ्यांना दुर्गंधी, कचरा व अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सदर समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत नगरपालिका प्रशासनाने संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठवडे बाजार परिसरात पाठवले. शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याच दिवशी तातडीने स्वच्छता मोहीम राबवली.
या उपक्रमात बाजार परिसर स्वच्छ करण्यात आला असून नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शिवसेना जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, युवा शाखेचे प्रमुख अजय तायडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन तत्परतेने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे