यावल न्युज
यावल तालुक्यातील किनगाव येथील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर परमिट रूम व लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर, गुरुवारी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी एक ३० वर्षीय महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली, तर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकात हवालदार वासुदेव मराठे, पोलिस नाईक अमित तडवी, सागर कोळी, एजाज गवळी, भरत कोळी, महिला पोलिस कर्मचारी मिनाक्षी तडवी व अलाऊद्दीन तडवी यांचा समावेश होता. पथकाने सापळा रचून बनावट ग्राहकाच्या मदतीने हॉटेल मनमंदिरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली.
या कारवाईतून एका महिलेची सुटका करण्यात आली असून, हवालदार वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (वय २८, रा. दहिगाव), पराग प्रकाश लोहार (वय २४, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व समाधान शालिक तायडे (वय २२, रा. साकळी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल, रोख रक्कम व इतर संशयित साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठा धक्का मानली जात आहे.