यावल न्युज : हर्षल आंबेकर
यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेतमजूर ज्ञानसिंग गंजा बारेला यांच्या घराला 1 मे 2025 रोजी सायंकाळी 5:15 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही घटना गावाच्या शेती शिवारात घडली असून, आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंसह एकूण अंदाजे 1 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील आणि महसूल सेवक विजय आढाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी ही दुर्घटना अतिशय धक्कादायक असून गरजू शेतमजुराच्या संसारावर त्याचा मोठा आघात झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, ग्रामस्थांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.