यावल न्युज – सुपडू संदानशीव
चुंचाळे येथील ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेलं मुबारक तडवी यांचं आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरलं असून, ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत गावात लवकरच पूर्ण दारूबंदी लागू करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुबारक तडवी यांनी सुरू केलेलं हे उपोषण गावात दारूबंदीच्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी होतं. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामसभेत एकमताने मंजूर झालेल्या दारूबंदीच्या ठरावावर सहा महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
मुबारक तडवी यांच्या मागण्यांची दखल घेत अखेर ग्रामसेवक निकेतन बिऱ्हाडे आणि उपसरपंच संजय पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने लेखी आश्वासन दिलं आहे की, लवकरच दारूबंदी अंमलबजावणीसाठी एक विशेष समिती स्थापन करून संपूर्ण गावात दारू विक्रीवर बंदी घालण्यात येईल.
या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून, तडवी यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पुढील कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतीकडून समितीचे कार्य लवकरच सुरू होणार आहे.