यावल न्युज प्रतिनिधी - सुपडू संदानशीव
चुंचाळे ग्रामपंचायतीसमोर आजपासून मुबारक नबाब तडवी यांनी गावात दारूबंदीच्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू झालेलं हे आंदोलन, ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधातील संतापाचे रूप घेत आहे.
मुबारक तडवी यांनी यापूर्वी ५ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीला लेखी अर्ज देत गावात दारूबंदीची मागणी केली होती. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते दारूबंदीचा ठराव (ठराव क्र. ०८) मंजूर करण्यात आला. मात्र, आज सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी हेतुपुरस्सर दिरंगाई केली असून, त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी तडवी यांनी केली आहे.
मुबारक तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात २ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० व ४६७ अर्तगत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.