यावल शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत – आठवडे बाजारातील अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका; मनसेच्या वतीने निवेदन सादर

यावल न्युज
यावल शहरातील गेल्या आठवड्यापासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणि आठवडे बाजाराच्या ठिकाणी वाढलेले अतिक्रमण यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून यावल नगरपरिषदेला निवेदन दिले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून पूर्णतः ठप्प असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत झाला आहे. मनसेच्या वतीने या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार तातडीने अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, यावल शहरातील आठवडे बाजार हा महामार्गा जवळ भरत असल्याने तेथे अपघाताचा धोका वाढला आहे. बाजार परिसरातील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचीही गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही नगरपरिषदेने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहरातील महिलांसाठी प्रसाधनगृह व सार्वजनिक शौचालयाच्या सुविधाही उपलब्ध नसल्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 वरील मागण्या तातडीने पूर्ण करण्यात आल्या नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिक व महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गौरव कोळी, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, जनहित विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर आणि अन्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने