किनगाव येथील सिमेंट पुल कामाबाबत अनियमिततेची तक्रार; चौकशीची मागणी

यावल (प्रतिनिधी) 
यावल तालुक्यातील किनगाव (ता. यावल) येथील सिमेंट रस्त्याच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार सरफराज पिंजारी यांच्या म्हणण्यानुसार, सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेमार्फत सिमेंट काँक्रीट पुलाचे काम मंजूर झाले होते. संबंधित काम हे डिसेंबर २५ - २६ या कालावधी मध्ये पुर्ण करण्यात आले. कामासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष काम दर्जाहीन झाल्याचा तसेच अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्याचे दर्शवून बिल काढण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रस्त्याची जाडी व लांबी अंदाजपत्रकाप्रमाणे नसून कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे संबंधित कामाची तांत्रिक चौकशी करून जबाबदार ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी होणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने