यावल-टाकरखेडा मार्गावर एसटी–ईकॉची जोरदार धडक : १०-१२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

यावल प्रतिनिधी :

यावल-टाकरखेडा मार्गावरील भालशिव पिंप्री फाट्याजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास एसटी बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ईकॉ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकासह सुमारे १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल बसस्थानकावरून बोरावल गावाकडे जाणारी एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावलमधील एका खासगी शाळेकडे विद्यार्थी घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईकॉ कार समोरून आली. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की ईकॉ कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना त्वरित यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांकडून विशेष उपचार सुरू आहेत.

या बसचे चालक ए. ए. तडवी व वाहक एस. एम. पाटील होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विद्यार्थी वाहतूक करणारी ईकॉ कार ताब्यात घेण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. या घटनेनंतर पालकवर्गात चिंता व्यक्त होत असून, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने