यावल न्युज :
यावल-रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी हाती घेतलेला उपक्रम आता गतीमान होत आहे. त्यांच्या पुढाकारातून रविवारी २५ ज्येष्ठ नागरिकांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील नेत्रशल्यचिकित्सा विभागात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या.
शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना आवश्यक उपचार करून घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. यासोबतच रुग्णांना घरी जाण्यासाठी रुग्णवाहिकेची मोफत सोय उपलब्ध करून दिल्याने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
वैद्यकीय क्षेत्रातील मोलाचे योगदान
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. शोबिया अन्सारी, डॉ. वृंदा कुंभारे, डॉ. भारती वाणी, डॉ. मयुरेश डोंगरे आणि डॉ. स्वाती असोले यांचे विशेष सहकार्य लाभले.
समाजसेवेतील कार्यकर्त्यांची मदत
कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यात शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील, होनाजी चव्हाण, चैतन्य कोल्हे आणि तुषार घुगे पाटील यांचा मोलाचा सहभाग राहिला.
लोककल्याणासाठी विधायक उपक्रम
आमदार अमोल जावळे यांनी यावेळी सांगितले की, “अनेक गरीब आणि दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे योग्य नेत्रउपचार मिळत नाहीत. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. हे समाधान देणारे कार्य आहे. ‘मोतीबिंदूमुक्त यावल-रावेर तालुका’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन पुढेही सातत्याने केले जाईल.”
आ. अमोल जावळे यांच्या या लोककल्याणकारी पुढाकारामुळे अनेक गरजू नागरिकांना नवे आयुष्य मिळाले असून, या उपक्रमाचे समाजभरातून कौतुक होत आहे.