बिबट्याच्या हल्ल्यांनी हादरला यावल तालुका – हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

बिबट्या अखेर जेरबंद


यावल :- तालुक्यात दीड महिन्याच्या आत दोन बालकांचे जीव घेणाऱ्या बिबट्याला अखेर डांभुर्णी शिवारात शिताफीने जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. हल्लेखोर बिबट्याच्या ओळखीची खात्री करण्यासाठी त्याचे स्वॅब नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

साकळी आणि डांभुर्णी या दोन शेतशिवारांमध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डांभुर्णी येथील घटनेनंतर त्याच परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात आणि सापळ्यात एकच बिबट्या तीनदा कैद झाला होता. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पुन्हा शिकार स्थळाजवळ परतल्याने त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले. यासाठी चार पिंजरे लावण्यात आले होते, ज्यामध्ये वनपाल गणेश गवळी, डॉ. यश सागर आणि मानवजीव रक्षकांची विशेष भूमिका होती.

बिबट्याला पकडल्यानंतर उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी सुनील भिलावे व स्वप्निल फटांगरे, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात त्याला यावल येथील वन उपकेंद्रात आणण्यात आले. मध्यरात्री १२.३० वाजता बिबट्याला नागपूरला रवाना करण्यात आले. सुमारे तीन वर्ष वयाची ही मादी बिबट्या असून तीच बालिकेवर हल्ला करणारी असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्या एकदा शिकार केल्यावर साधारण आठ तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी परततो, या आधारावर ट्रॅप कॅमेरे व सापळा लावण्यात आला होता. तीन वेळा शिरसाड आणि साकळी शिवारांमध्ये बिबट्याने गुंगारा दिला होता. मात्र, डांभुर्णीमध्ये अखेर तो सापडला.

ही कारवाई वनविभागाच्या सूक्ष्म नियोजनामुळे शक्य झाली असून, आता नागपूर येथून स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर हल्लेखोर बिबट्याबाबत अंतिम खात्री होणार आहे. तालुक्यावासीयांनी दिलासा घेतला असला तरी बिबट्याचा प्रश्न पूर्णतः सुटला नसल्याने सतर्कतेची गरज कायम आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने