यावल :- मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याचा रावेर आणि यावल तालुक्यांमध्ये भाजपकडून तीव्र निषेध करण्यात आला. खडसेंनी वापरलेली भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
यावल येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन दिले. खडसेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पांडुरंग सराफ, माजी चेअरमन नरेंद्र नारखेडे, बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, व्हाईस चेअरमन अतुल भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, रावेर येथेही भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सुरेश धनके, पद्माकर महाजन, सुनील पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वरणगाव येथील तिरंगा सर्कल चौकातही घोषणाबाजी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ नेते अल्लाद्दीन शेख, नाना चौधरी, शामराव धनगर आदींनी खडसेंविरोधात नाराजी व्यक्त केली.