सायबर सुरक्षिततेची शपथ घेत विद्यार्थ्यांचा डिजिटल सुरक्षेकडे निर्धार; पी. आर. हायस्कूलमध्ये सायबर जनजागृती अभियान उत्साहात साजरा

धरणगाव : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सुरक्षित व जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Cyber Warriors उपक्रमांतर्गत जे. पी. आर. हायस्कूल, धरणगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून आपले ज्ञान समृद्ध केले.
या जनजागृती सत्रात ऑनलाइन फसवणूक, फिशिंग लिंक, OTP व बँकिंग फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, सायबर बुलिंग, बनावट वेबसाईट्स व डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनातील वास्तव उदाहरणांद्वारे सायबर गुन्हे कशा पद्धतीने घडतात आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक पद्धतीने प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योग्य उत्तरे देत सायबर सुरक्षेविषयीची जागरूकता दाखवून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी "We Are Cyber Warriors" ही शपथ घेत स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच इतरांनाही सायबर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा संकल्प केला.

*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे समन्वयक प्रा. आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील व विद्या विशाल सोनवणे* यांनी हे जनजागृती सत्र प्रभावीपणे पार पाडले. या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य दिनेश पाटील सर, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित डिजिटल समाज घडविण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने