विद्यार्थ्यांनी घेतला ‘सायबर सुरक्षित भारत’ घडविण्याचा संकल्प; इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात प्रभावी सायबर सुरक्षा जनजागृती

धरणगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Cyber Warriors उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना फेक लिंक, OTP शेअर करण्याचे धोके, सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती, डिजिटल पेमेंट करताना घ्यावयाची काळजी, सायबर बुलिंग, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष उदाहरणे आणि संवादात्मक सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना विषय सहज समजला तसेच त्यांनी अनेक शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी "We Are Cyber Warriors" ही सायबर सुरक्षा शपथ घेत सुरक्षित डिजिटल भारत घडविण्यासाठी स्वतः जागरूक राहण्याबरोबरच समाजातही सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे समन्वयक प्रा. आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील व विद्या विशाल सोनवणे* यांनी संवादात्मक पद्धतीने हे सत्र यशस्वीरीत्या पार पाडले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली आणि सुरक्षित डिजिटल समाज घडविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने