किरण तायडे :यावल :
लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणात यावल येथील वनरक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल (जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, तक्रारदार हा यावल परिसरातील असून तो पिकअप वाहनांद्वारे लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतो. या वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने २० मार्च रोजी एसीबी, जळगाव येथे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. आरोपीने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसली तरी लाच मागणीचा ठोस पुरावा मिळाल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपीकडून ९,०४० रुपये रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यात सॅमसंग कंपनीचा (अंदाजे किंमत २५ हजार रुपये) व आयटेल कंपनीचा (अंदाजे किंमत १ हजार रुपये) मोबाईलचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.
या कारवाईमुळे वन विभागातील लाचखोरीच्या प्रकरणांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.