यावल | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे दाखल असलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी तसेच त्यातील साक्षीदारांचे जबाब बदलण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मिलिंद प्रभाकर चौधरी (वय ५८, रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध यापूर्वी संशयित आरोपी रामचंद्र दाजीबा पाटील (रा. किनगाव) याने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २१ ते २५ जानेवारी या कालावधीत आरोपीने चौधरी यांच्या एका मित्राला फोन करून धमकी दिली.
“पैसे दिले नाहीत तर माझी माणसे गुन्ह्यात तुझ्याविरुद्ध साक्ष देतील आणि तुला जेलमध्ये जावे लागेल,” अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
प्रारंभी आरोपीने २ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र नंतर तडजोडीनंतर १ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरले. वारंवार होणाऱ्या खंडणीच्या मागण्या व धमक्यांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने अखेर मिलिंद चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार, यावल पोलिसांनी रामचंद्र पाटील याच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सूर्यवंशी करीत आहेत.