सावदा शिवारात ९३ गांजाची झाडे जप्त; सावदा पोलिसांची धडक कारवाई

सावदा (प्रतिनिधी) – सावदा पोलीस स्टेशन हद्दीत सावदा–फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैरम बुवा देवस्थान परिसरातील शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सावदा पोलिसांनी छापा टाकून सुमारे २८ किलो ५४० ग्रॅम वजनाची ९३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ९४ हजार ७२ रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावदा येथील गुरुकुल विद्या मार्गाने कोचूर रस्त्यालगत बैरम बुवा मंदिराजवळील एका शेतात निलेश रमेश पाटील (वय ४०) यांनी गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शेतावर छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान शेतामध्ये लावलेली ९३ गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या छाप्यामध्ये फौजदार सानप, तहसील प्रशासनाकडील तलाठी तडवी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस संजू चौधरी, राजेंद्र वैदकर, निलेश बाविस्कर, सुनील शेंदाळे तसेच गुरुरक्षक जवान यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने